बाॅलीवूडच्या अभिनेत्रीला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक?
अभिनेत्रीवर गंभीर आरोप, त्याच्यासोबतची जवळीक अभिनेत्रीला महागात
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बॉलिवूड मधील टाॅपच्या अभिनेत्रीला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मिस श्रीलंका राहिलेली जॅकलिन फर्नांडिस. तिच्याविरूद्ध दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. जॅकलिनने तपासात सहकार्य करत नसून ती पळून जाण्याच्याही प्रयत्नात होती, असा तिच्यावर आरोप आहे.
ईडीने जॅकलिन तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. तिने २०२१ मध्ये भारतातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप ईडीने केला आहे.जॅकलीनने केवळ मौजमस्तीसाठी ७.१४ कोटी रुपये उधळले असा आरोपही ईडीने केला आहे. जॅकलीन फर्नांडिसने या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले. तिने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. लोक नेहमीच सेलिब्रिटींना भेटवस्तू देतात, मग त्यांना कसे कळेल की ते गिफ्ट नव्हे तर घोटाळ्याचा पैसा आहे. असा दावा देखील तिने केला आहे. ईडीने आतापर्यंत जॅकलिनला ५ वेळा चौकशीसाठी बोलावले आहे. जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टात सुमारे दीड तास युक्तिवाद झाला आणि कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय ११ नोव्हेंबर रोजीआपला निर्णय देऊ शकते.
सुकेश चंद्रशेखरसोबत असणारी जवळीक जॅकलिनला चांगलीच महागात पडली आहे. त्याच्या घोटाळ्याबाबत ठावुक असूनही त्याच्याकडून महागडी गिफ्ट्स घेतल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. सुकेश सध्या तिहार जेलमध्ये आहे. जॅकलिनने तिचा या २०० कोटींच्या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे वेळोवेळी म्हटले आहे. तिचे सुकेशशी वैयक्तिक संबंध होते, असा तिचा दावा आहे. आता न्यायालय जॅकलीनचा फैसला करणार आहे.