
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि आता ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना पत्र देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत ठाकरे सरकारच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन अमित शाह, महेश जेठमलानी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा केल्याची माहिती आहे.वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अचानक हालचाली वेगवान केल्या. काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फडणवीसांची चर्चा झाली. गेल्या आठवड्याभरातील ही फडणवीसांची पाचवी दिल्लीवारी असल्याचं बोललं जातं. दिल्लीहून परतल्यावर आज संध्याकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पुन्हा एकदा भाजप नेत्यांची बैठक झाली होती. तिथून फडणवीस थेट राजभवनावर गेले.