
मावळ प्रतिनिधी – पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरांमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी धरण भरण्यास विलंब लागला असला तरी आता धरण भरण्यास सुरुवात झाली आहे.
भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असतात आणि वर्षाविहाराचा आनंद लुटतात. येणार्या शनिवार व रविवारी याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसाय बंद असल्याने स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यंदा मात्र ही कसूर भरून निघणार आहे.लोणावळा पर्यटनस्थळ हे भारतात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात भुशी धरण हे पर्यटकांचे केंद्रबिंदू असते, भूशी डॅमला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. जून महिन्यात पाऊस झाला नाही. मात्र जुलै महिना सुरू होताच पावसाने जोरदार हजेरी लावली असून वर्षा विहारासाठी लोणावळ्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे. आज सकाळी दहा च्या सुमारास भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
भुशी धरण हे महाराष्ट्र राज्यातील जुन्या धरणापैकी एक आहे. हे धरण साधारण इसवी सन १८६० च्या सुमारास बांधले आहे. लोणावळा पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळविण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. पुण्यातून भुशी डॅमला जाणे सोपे पडते, पुण्यातून लोणावळा बस किंवा ट्रेन मिळतात.