वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं?
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला नितेश राणेंच्या टीकेचा समाचार
पुणे दि १२(प्रतिनिधी)- ‘ते कोण आहेत आणि कुठल्या पक्षात आहेत? त्यांना भाजपमध्येही किंमत नाही. वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांवर मी का बोलावं ? अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणे यांचा उल्लेखही न करता त्यांना सडेतोड उत्तर दिले.
आमदार नितेश राणे यांनी एकेरी उल्लेख करीत अत्यंत खालच्या पातळीवर केलेल्या टीकेला खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या नेहमीच्या संयमी शैलीत सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, कलाक्षेत्र हे माझे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे माझ्या उत्पन्नाचे जे काही स्त्रोत आहेत, ते उजळ माथ्याने मी चारचौघात सांगू शकतो. तसे ते सांगू शकत असतील तर त्याबाबत बोलूयात अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी नितेश राणे यांना शालजोडीतील फटकारे लगावले. छत्रपती संभाजी महाराज आणि मराठेशाहीचा इतिहास घरोघरी पोहचविण्यासाठी जो काही माझा खारीचा वाटा आहे, तो महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. पण या महाशयांनी इतिहास घरोघरी पोहचविण्यासाठी काही योगदान दिले असेल तर त्यांनी बोलावं अन्यथा ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी राणे यांचा समाचार घेतला.
२०२४ च्या निवडणुकीत आपण डॉ. कोल्हे यांना आपटू या राणे यांच्या वक्तव्याबाबत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत कोण उमेदवार जिंकतो? कोण हरतो? हे मायबाप मतदार ठरवतो. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीवर लोकांनी टाकलेल्या विश्वासाबाबत बोलू नये असे कोल्हे यांनी बजावले आहे.