‘देवाची कृपा असं म्हणून मुलांची पलटण वाढवू नका’
अजित पवारांचा महिलांना सल्ला, मूलं होणे देवाची कृपा नसते म्हणत टोलेबाजी
बारामती दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना कुटुंबनियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले आहे. उगाच देवाची कृपा… देवाची कृपा… असं म्हणून पलटण वाढवू नका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली होती.
अजित पवार यांनी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर गरजू महिलांना १ हजार स्वेटर, ५०० साडी वाटप तसेच १५ सिलाई मशीनचे वाटप अजित पवार यांच्यस हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘माझी महिलांना विनंती आहे की, आपली सून आली, मुलगी असेल, तिचं लग्न झालं तर २ अपत्यावर थांबा. पोरी सोन्यासारख्या आहे. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका. पवार साहेब एका मुलीवर थांबले. सुप्रियाताईंनी नाव काढलं नाही का? नुसतं पोरगंच पाहिजे, पोरगंच पाहिजे, असं करू नका. तुम्ही देखील थांबा नाहीतर म्हणाल की, देवाची कृपा देवाची कृपा आहे. देव वरून देतोय, आम्हाला माहिती नाही का कुणाची कृपा आहे,’ असे आवाहन करताच सभागृहात एकच हश्शा पिकला. याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला आहे.
माझ्या बारामतीत कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला सुरक्षित वाटले पाहिजेत. कुणाचेही लाड मी खपवून घेणार नाही. माझ्याजवळ बसणारा असेल आणि तो काही चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई करा असे स्पष्ट आदेश अजित पवार यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.