पुण्यात धुडगूस घालणाऱ्या कोयता गँगची पोलीसांनी काढली धिंड
गँगने ज्या भागात कोयते दाखवले तिथेच पोलीसांची धिंड कारवाई, व्हिडिओ व्हायरल
पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात बऱ्याच दिवसांपासून कोयता गँगमुळे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.अनेक व्यापारी या गँगला घाबरून आहेत. कोयते नाचवत हे राडा करत असल्यामुळे नागरिक देखील भयभीत आहेत.पण पोलीसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून दहशत माजवणा-या कोयता गँगची पोलीसांनी धिंड काढली आहे.
जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी घातक शस्त्र जमा करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा भागात हा प्रकार घडला होता. या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून ज्या ठिकाणी या आरोपींनी दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. समीर सलीम शेख आणि शाहीद फरीद शेख अशी त्यांची नावे आहेत. हातात बेड्या ठोकत पोलिसांनी त्यांना संपूर्ण परिसरातून फिरवले. दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी धिंड काढल्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. अनेक परिसात या गॅंगने धुमाकूळ घातला अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड करत नुकसान केले आहे. काही दिवसापूर्वी सिंहगड भागात सुद्धा पोलीसांनी कोयता गँगची धिंड काढली होती.
कोयता गॅंगविरोधात पुण्यात कॉंम्बिंग ऑपरेशन राबण्यात येत आहे. रोज अनेक परिसरात पोलीस रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांनी ७०० गुन्हेगारांची झाडाझडती घेतली असून अनेक आरोपींना अटक केली आहे. तरीही शहरात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गँगने अनेकांवर कोयत्याने वारदेखील केले आहेत. महिलांवर देखील हल्ले करण्यात आले आहेत.