…म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारला
या कारणाने नाकारला प्रवेश, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
केरळ दि १९(प्रतिनिधी)- प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल हिला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला आहे. केरळमधील एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात ‘धार्मिक भेदभावामुळे’ प्रवेश करण्यापासून अधिकाऱ्यांनी तिला रोखले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमाला पॉल सोमवारी तिरुवैरानिकुलम महादेवाच्या मंदिरात गेली होती. त्यावेळी तिला प्रवेश नकारला मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. त्यानंतर अमालाने मंदिराबाहेरुनच देवाचे दर्शन घेतले. अभिनेत्री अमाला पॉलने मंदिराच्या रजिस्टरमध्ये लिहिले की, ‘हे अतिशय दुःखद आणि निराशाजनक आहे की, २०२३मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. मी मंदिरात जाऊ शकले नाही. पण, दुरून दर्शन घेऊनही अनुभूती येत होती. मला आशा आहे की, धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. अशी वेळ येईल जेव्हा धर्माच्या आधारावर नव्हे, तर आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल.’ अशी आशा तिने व्यक्त केली आहे. मंदिराचे प्रशासन आता महादेव मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत आहे. तेथील अधिकाऱ्यांनी आपण फक्त मंदिराच्या नियमांचे पालन केले असे सांगितले आहे. अमला धर्माने ख्रिश्चन आहे. आणि दक्षिणेकडील काही मंदिरात फक्त हिंदुनाच प्रवेश दिला जातो.
अमला पॉल ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमालाने नागा चैतन्य, राम चरण, अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. अमला लवकरच अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात दिसणार आहे. पण त्याआधी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.