गुन्हे शाखेकडून नाना पाटेकरला तमिळनाडूतून अटक
गुंगारा देणारा पाटेकर अखेर पोलीसांच्या हाती. वेशांतर करत ठोकल्या बेड्या
बार्शी दि ५(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील पांगरीत नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी एका फटाका कारखान्यात स्फोट होऊन पाच महिलांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांना तमिळनाडूमधून अटक केली आहे.
पांगरी फटाका स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पांगरी येथे फटाका फॅक्टरीला भीषण आग लागली होती. या प्रकरणात नाना पाटेकर आणि युसुफ मणियार हे दोघे आरोपी जबाबदार आहेत. हे दोघेजण या पांगरी येथील फटाका कारखान्याचे मालक व भागीदार होते. या प्रकारानंतर नाना पाटेकर हा महाराष्ट्रातून फरार झाला होता. कर्नाटक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तिथेही पोहोचले. मात्र तेथूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गोपनीय बातमीदारांच्या व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी नाना पाटेकर हा महाराष्ट्र सोडून तामिळनाडूच्या हद्दीत पोहोचला असल्याची माहिती मिळवली आणि तेथे वेशांतर करून पोलीस काही दिवस राहिले होते. अखेर पोलीस पाटेकरला अटक करण्यात यशस्वी झाले आहेत.
नाना पाटेकर याला अटक करण्यात आली असून बार्शी न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नाना पाटेकरला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे, श्रीकांत गायकवाड, हरिदास पांढरे, समर्थ गाजरे, सलीम बागवान, दिलीप थोरात आदींच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल करत आहेत.