
मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे ठाकरे गट?
हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर, देशपांडेंचा पत्रकार परिषदेत इशारा
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना काल डिस्चार्ज करण्यात आलं होतं. संदीप देशपांडे यांच्यावर ज्यांनी हल्ला केले ते हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
संदीप देशपांडे दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट स्टम्प्सने हा हल्ला करण्यात आला होता तसेच हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता.आता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला आहे. दोन जणांना काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलीसांनी तपासासाठी आठ पथके तयार केली होती. देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान माझ्यावर कुणी हल्ला केला हे मला माहीत आहे. त्याबाबतची माहिती मी पोलिसांना दिली आहे. माझं म्हणणं मी एफआयआरमध्ये दिली आहे. त्यामुळे पोलीस तपास करत आहेत. ही चौकशी संपेपर्यंत मी कुणाचंही नाव घेणार नाही असे इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
कोरोनाच्या भ्रष्टाचारामागे कोणती विरप्पन गँग आहे हे सर्वांना माहीत आहे. मी दोन दिवसात एक घोटाळा काढणार होतो. असा दावा करत देशपांडे यांनी ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. तसेच त्यांच्या पायालाही जबर मार लागला आहे.