मुंबई दि १ (प्रतिनिधी)- ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केल्याने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांना मध्यरात्री ईडीने अटक केली. आज सकाळी मेडिकल चेकअपसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आलं तर दुपारी २ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्यावतीने जोरदार युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या मालकीच्या काही कंपन्या आहेत. या व्यवसायातून त्यांनी वैध मार्गाने पैसे कमावले आहेत, त्यांचा घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, असं अॅड. मुंदरगी यांनी सांगितलं. त्यावर पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचं ईडीच्या वकिलांनी सांगितलं.तसेच राऊतांच्या ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. राऊतांचे वकील अॅड मुंदरगी यांनी मात्र याला विरोध दर्शवताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.
संजय राऊत हार्ट पेशंट असल्याने त्यांना घरचे जेवण देण्यात यावे ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आता चार तारखेला कोठडीत वाढ होणार की राऊतांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.