मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे पुण्यातील उद्यान उद्घाटन रद्द
माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी उद्यानाला दिलेले नाव वादात
पुणे दि २(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते त्यांचेच नाव असलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. पण त्यावर वाद निर्माण झाल्याने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडून उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या नावाला अद्याप महापालिकेने मंजूरी दिलेली नसल्याने
वाद निर्माण झाला होता.
यासोबतच हे उद्यान महापालिकेच्या जागेवर खासगी विकासकाकडून विकसित करण्यात आले आहे. त्यासाठीची हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उद्घाटन केल्यास मुख्यमंत्री वादात सापडण्याची शक्यता होती. मात्र आता मुख्यमंत्री या उद्यानाचं उद्घाटन करणार नसल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री फक्त या उद्यानाला भेट देणार आहेत. यापूर्वी पंढरपूरमध्ये परवानगी नसलेल्या इस्कॅान टेंपलचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे वाद उभा राहिला होता. त्यामुळे नवीन वाद नको म्हणत उद्यानाचे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नाना भानगिरे यांनी त्यांना समर्थन जाहीर केले होते. त्यांच्याकडे शिंदे गटाकडून पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याच पुढाकारातून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती.