ही महिला आयपीएस अधिकारी शिक्षण मंत्र्याबरोबर अडकली लग्नाच्या बेडीत
लग्नाची जोरदार चर्चा, फोटो व्हायरल, दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची लग्नाला हजेरी
मोहाली दि २५(प्रतिनिधी)- लोकप्रशासन चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र काम करत असतात. पण पंजाबमध्ये मात्र मंत्री आणि आयपीएस अधिकारी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पंजाब मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री असलेले आनंदपूर साहिब मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार हरजोत सिंग बैस यांनी आयपीएस अधिकारी ज्योती यादव यांच्याशी लग्न केले आहे.
कॅबिनेट मंत्री हरजोत बैस यांचे लग्न गुरुद्वारा बिभोर साहिबमध्ये झालं. हरजोत सिंह रोपड जिल्ह्यातील आनंदपूर साहिब मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाबचे शिक्षणमंत्रीही आहेत. याआधी ते तुरुंग मंत्रीही होते. तर ज्योती यादव सध्या मानसा इथं पोलीस अधीक्षक पदी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी हरजोत सिंह बैस आणि ज्योती यादव यांचा साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. लग्नाच्या फोटोत हरजोत सिंह बैंस वराच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होते आणि त्यांची पत्नी लाल लेंहग्यात खूपच सुंदर दिसत होती. या लग्नासाठी गुरुद्वारा विभोर साहिब येथे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कॅबिनेट मंत्री हरजोत सिंग बैंस यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवा आणि मंत्री लालजीत भुल्लर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
ज्योती यादव या पंजाब केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. लुधियाना दक्षिणमधील आप आमदार राजिंदरपाल कौर छिना यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी वाद झाल्याने ज्योती यादव चर्चेत आल्या होत्या. यादव यांनी न सांगता त्यांच्या मतदारसंघात शोधमोहीम राबवल्याचा आरोप छिना यांनी केला होता.