मुंबई दि ३(प्रतिनिधी)- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची एक इच्छा त्यांचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. आपण उपमुख्यमंत्री असताना मिळालेला देवगिरी बंगला विरोधी पक्ष नेता म्हणून कायम ठेवावा ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदावर होते. यावेळी त्यांचे वास्तव्य ‘देवगिरी’ बंगल्यावर होते. हा बंगला सरकारमधील क्रमांक दोनच्या नेत्याला दिला जातो. आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी आल्यापासून जवळपास दहा वर्षे अजित पवारांकडे देवगिरी होता. मध्यंतरी भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांना हा बंगला सोडावा लागला.पण महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर अजित पवार यांनी याच बंगल्याला पसंती दिली.पण आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता असलो तरी देवगिरी माझ्याकडेच राहू द्यावा, अशी मागणी करणारी दोन पत्रं अजितदादांनी फडणवीसांना लिहिली होती.त्यामुळे फडणवीसांनी मित्राची इच्छा पूर्ण करताना देवगिरी अजितदादांकडेच राहील असे परिपत्रक काढले आहे.
देवगिरीवर तसं पाहता उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अधिकार आहे. मात्र फडणवीस आता सागर बंगल्यावरच राहणार आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीच्या नव्या पालवीने पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.