विधानसभेच्या जागा वाटपावरुन भाजप शिवसेना युती तुटणार?
युतीतील दोन्ही पक्षांचा निर्वाणीचा इशारा, कार्यकर्ते अस्वस्थ, मुख्यमंत्री पदावरुनही वाद
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला अजिन वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागावाटपावरून आत्तापासून वादाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा २४० जागा लढवणार असल्याचे वक्तव्य केल्यापासून भाजपा आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे युतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून जागा वाटपाबाबत एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले “२०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार १०० टक्के निवडून येतील. भाजप २४० च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ५० पेक्षा जास्त आमदार नाहीत. आपण २४० जागा लढवल्या तर कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागणार आहे. असे सांगताना शिवसेनेला फक्त ५० जागा देणार असल्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर शिवसेनेकडून भाजपावर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. या चर्चेनंतर आता शिवसेनेचे संसदीय नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी जागा वाटप कसे होणार ते सांगून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमजोर नाही. पूर्वी युती असताना विधानसभेला शिवसेनाला १२६ तर भाजपला १६२ हा फॉर्म्युला होता. तर लोकसभेला शिवसेनेला २२ तर भाजपला २६ जागा मिळत होत्या. आताही युती झालेली आहे. त्यामुळे २०१९ च्या फॉर्म्युल्यात कुठलाही बदल होणार नाही. त्यावेळी जो फॉर्म्युला घेऊनच पुढे जावे लागणार आहे.” असे सांगत जागा वाटपात तडजोड होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. या चर्चांमुळे दोन्ही गोटातील कर्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. कारण शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला आहे तर भाजपानेही विरोधी पक्षात असताना सर्व जागेवर तुल्यबल उमेदवारांना बळ देत लोकसभा किंवा विधानसभेचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
भाजपा व शिवसेनेत जागा वाटपावर तणावाची स्थिती असताना मनसेसोबत युतीची खलबते सुरु आहेत. आगामी निवडणूकीत मनसेची युती झाल्यास मनसे किती जागा लढणार याची अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याचबरोबर मनसे या युतीत सामील झाल्यास एकाच युतीत तीन मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील कारण भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, तर मनसेकडून राज ठाकरे या शर्यतीत आहेत. त्यामुळे जागा वाटपात युतीत दुभंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.