
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच भाजपाशी युती करणार?
राज्यसह देशातील राजकीय समीकरणे बदलणार? बघा पडद्यामागे कोणती खेळी?
सांगली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. नागालँड मध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता रामदास आठवले यांनी थेट पवारांना आॅफर दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की,शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून पंतप्रधान मोदींकडून पवारांचे अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या, तरी २०२४ मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे. नागालँड प्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी अनेक विषयावर भाष्य केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईशी भाजपचा संबंध नाही. राहुल गांधी यांनी सांभाळून बोलले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही. असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर राज्यातल्या शिवसेनेच्या आणि सत्ता संघर्षाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल, असे मत देखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस विकास करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. असा खोचक टोला आठवलेंनी लगावला.
आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. शिर्डीमधून पुन्हा लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी बोलून शिर्डीची जागा मागून घेणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात २ जागा मागणार असल्याचे ते म्हणाले.