पुणे दि ४ (प्रतिनिधी)- पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडील प्रकल्पांना गती मिळाली असून नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसांत पुणे शिरूर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
शिरूर मतदारसंघातील ररस्त्यांची यंदाच्या पावसाळ्यात बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या संथ कामावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राहिलेले नाशिक फाटा ते चांडोली, वाघोली – शिरूर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प लवकर मार्गी लागावेत यासाठी कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महामार्गांची झालेली दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असल्याचे निदर्शनास आणत हे सर्व प्रकल्प लवकर सुरू व्हावेत अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी नाशिकफाटा ते चांडोली या लांबीतील एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पुणे अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली ते शिरुर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या दोन्ही महामार्गावर एलिव्हेटेड रस्ता, नारायणगाव बायपास रस्त्यावरील खोडद येथील अंडरपासचे काम या प्रश्नावर देखील सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.