विरारमध्ये मोठा राडा..! विनोद तावडेंवर पैसे वाटप करत असल्याचा बविआचा आरोप; आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया समोर
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून आहेत. जोपर्यंत विनोद तावडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तावडेंना सोडणार नाही असा पवित्रा क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. या प्रकारामुळे हॉटेल परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. तसेच याच हॉटेलमध्ये एका रुममध्ये ७ महिला आढळून आल्या. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या ठिकाणी बविआ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच विरारमधील हॉटेल विवांतमध्ये बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्ते, पोलिसांसह हॉटेलच्या काही रुमची झडती घेतली. त्याच वेळी ७ महिला आढळून आल्याने खळबळ उडाली. या महिलांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण सगळे एका ग्रुपने आलो असल्याचे सांगितले. आपण एका व्यक्तीसोबत आलो असल्याचे या महिला म्हणाल्या आहेत.
यावर आता विनोद तावडेंची माध्यमांना प्रतिक्रिया आली आहे. आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले. तसेच हितेंद्र ठाकूर असतील, क्षितीज ठाकूर असतील तेही आले त्यांची माझी चर्चा सुरु आहे. जर पैसे वाटप होत असेल तर त्यांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज, पोलीस सगळे आहेत. निवडणुकीच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचे तर कसे घ्यायचे अशा गोष्टी मी सांगत होतो, असे तावडे म्हणाले.