Latest Marathi News
Ganesh J GIF

शिरूर-हवेलीमध्ये आबा आणि बापू यांच्यात दुरंगी लढत ; कटके कि पवार? शिरूर-हवेली मतदारसंघात आमदार कोण होणार ?

 (प्रतिनिधी – चंद्रकांत दुडे ) – २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरूर-हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार अशोक पवार व महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर कटके यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभा झाल्यानंतर सुरुवातीला सोपी व एकतर्फी वाटणारी ही लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांना या लढाईत विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालणार आहे, याचा अंदाज अजून आलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या विरोधात व्यूहरचना आखत राष्ट्रवादीसहित महायुतीने नेते ज्ञानेश्वर कटके यांच्या मागे ताकद लावली आहे. मतदारसंघात दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पातळीवर निधी आणण्यात चांगला प्रयत्न केला आहे.सध्या मतदारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांची मतदारसंघात गावनिहाय पायपीटही सुरू आहे. तसेच शहरी मतदाराला बांधून ठेवण्यासह त्याला मतात कनव्हर्ट करण्यासाठी त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र स्पर्धा लागली आहे.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यावर राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य चांगले आहे. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे एक प्रकारे या मतदारसंघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विचारांचा आमदार राहणार आहे, हे नक्की. येथे भाजपने दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या माध्यमातून चांगला जम बसवला आहे. ते महायुतीमध्ये भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, परंतु ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने त्यांनी ताकद कटके यांच्यामागे उभी केली आहे.

तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे.याबरोबरच महायुतीकडून घोडगंगा कारखान्याचा प्रश्न आक्रमकपणे प्रचारात मांडला जात आहे. नाराज शेतकरी सभासदांची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी महायुतीने रणनीती महायुतीने आखली आहे. कारखान्याचा प्रश्न आमदार पवार यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. दुसऱ्या बाजूला आमदार अशोक पवार स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून ते शक्य ती गोष्ट करत आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. याचा फायदा आमदार पवार यांना कितपत होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या स्थितीला कटके यांचे पारडे जड आहे. पुढील दोन दिवसांत प्रचार कसा होतो आणि बूथ मॅनेजमेंट कोणाचे उत्तम होते, त्यावर निकाल ठरणार आहे.

 


 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!