
न्यायालयात वकिलांच्या घोळक्याची पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांचे कपडे फाडले, बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, न्यायालयात नेमके काय घडले?
वाराणसी – : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील न्यायालयीन संकुलात वकिलांच्या एका गटाने पोलीस उपनिरीक्षक आणि एका हवालदारावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक मिथिलेश प्रजापती हे गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रिमांड स्लिप मिळविण्यासाठी दुपारी अडीच वाजता कोर्टाच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादाच्या प्रकरणात शांतता भंग केल्याबद्दल एका वकील आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे वकील संतप्त झाले होते. त्यावेळी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कार्यालयाजवळ अचानक वकिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते निरीक्षक अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कार्यालयात घुसले आणि दरवाजा बंद केला. वकिलांनी धक्काबुक्की करून जबरदस्तीने दार उघडले. त्यांनी ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कोर्ट क्लर्क रामा प्रसाद यांनाही इन्स्पेक्टर समजून मारहाण केली. वकिलांनी पोलीस निरीक्षकाचा गणवेश देखील फाडला होता. वकिलांनी केलेल्या मारहाणीमुळे मिथिलेश नाल्यात पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना गंभीर अवस्थेत बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त कँट नितीन तनेजा आणि स्टेशन हाऊस ऑफिसर इन्स्पेक्टर शिवकांत मिश्रा घटनास्थळी पोहोचले. त्यानीच मिथिलेश यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात आमी न्यायालयाच्या आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

