हडपसर,पुणे प्रतिनिधी – मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी (12 डिसेंबर ) रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, मांजरी, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट यांच्यासह 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय 18, रा. ऑर्चिड रेसीडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्या मोटारीचा धक्का लागल्याने आरोपी विलास सकट याच्याशी वाद झाला. भोसले आणि त्यांचा भाचा अथर्व मोटारीतून फुरसुंगी-चंदवाडी रस्त्यावरुन मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. आरोपी सकट आणि साथीदारांनी मोटारचालक भोसले आणि अथर्व याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भोसले यांच्यावर शस्त्राने वार केले. अथर्वने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.