कागल (कोल्हापूर) – आयफोन खरेदीसाठी पैसे मागितल्याने वाद झाल्यानंतर अमरसिंह थोरात (गोटखिंडी, जि. सांगली) या तरुणाचा खून त्याचा वडील व भावाने केल्याचे शुक्रवारी उघड झाले. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वडील दत्ताजीराव सर्जेराव थोरात (५७ ) व भाऊ अभिजित (२६) या दोघांना अटक केली आहे.
अमरसिंह हा मंगळवारी सायंकाळी गोठखिंडी येथे घरी गेला होता. त्याला दारूचे व्यसन होते. चैनीसाठीही तो वारंवार वडिलांकडे पैसे मागत होता. यावेळी तो आयफोन खरेदी करण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपये मागत होता. यातून या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. पैसे दिले नाही तर घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी अमरसिंहने दिली.
या रागातून वडील दत्ताजीराव याने लोखंडी पाइप डोक्यात घातला. तो जखमी होऊन जमिनीवर पडला. मात्र, कोणतेही उपचार न करता त्याला तसेच ठेवल्याने डोक्यातून मोठा रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दिवसभर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार रात्री चारचाकी गाडीच्या डिक्कीत मृतदेह ठेवला होता.