या कारणासाठी सरपंचाचे साडी नेसत अनोखे आंदोलन
पैसे, कार आणि आता साडी, अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:ची गाडी जाळून आंदोलन केले होते. आता साबळे पुन्हा एकदा अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून चार-चार वर्षे झाले पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी महिला वेशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर डोक्यावर कळशी घेत साडी घालून आंदोलन केले आहे. जल जीवन मिशनचे काम अपूर्ण आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावेळी बोलताना साबळे म्हणाले की, २०२०-२१ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. काम सुरु करण्यात आले. जमीनीत यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. पाईपलाइन टाकून चार वर्षे झाली. मात्र, अद्याप गावात पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. गावातील महिला अजूनही पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे महिलांच्या व्यथा मांडण्यासाठी साबळे यांनी साडी घालून आंदोलन केले. यावेळी उन्हाळ्यापर्यंत पाणी न मिळाल्यास आमचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंगेश साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना दिला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२८ पर्यंत जल जीवन मिशनला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. त्यात १५ कोटी कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.
https://www.facebook.com/share/v/1AF5wVz6Kr/
मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अधिकाऱ्याने काम करण्यासाठी टक्केवारी मागितली म्हणून त्यांनी पैसे उधळत आंदोलन केले होते. तर मराठा आरक्षणासाठी मंगेश साबळे यांनी स्वत:ची नवी कार जाळली होती. आता पुन्हा साबळे अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत.