
तरुणाला पडायचे मृत व्यक्तीचे स्वप्न ; स्वप्नाच्या आधारे पोलिसांनी सुरु केला तपास अन् सापडला कुजलेला मृतदेह
एखाद्या तरूणाला मृत व्यक्तीचे स्वप्न पडते आणि तो हे पोलिसांना सांगतो. पोलीस त्याच्या स्वप्नाच्या आधारे तपास करतात आणि खरंच त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडतो. ही कुठल्या सिनेमाची कथा नाही तर, रत्नागिरीतील खेड तालुक्यातील घडलेली सत्य घटना आहे.

या घटनेबाबात माहिती अशी की, सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी येथील ३० वर्षीय योगेश पिंपळ आर्या नावाचा तरूण १७ सप्टेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने पोलिसांना सांगितले की, मला वारंवार स्वप्न पडत आहे की, खेड पोलीस ठाण्यासमोर एका पुरूषाचे प्रेत असून तो मदतीची याचना करत आहे. पोलिसांनी तरूणाच्या स्वप्नाच्या आधारे एफआयआर दाखल केली आणि तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी योगेशवर विश्वास ठेवत संबंधित भागाची पाहणी केली तर खरंच सर्वांना चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला.

भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून आणि त्याला टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या व्यक्तिने घातलेल्या कपड्यांमध्ये मानवी हाडे सापडली तर, मृतदेहापासून पाच फूट अंतरावर एक कवटी देखील सापडली. मृतदेहाजवळ सॅक सापडली परंतू त्याची ओळख पटेल असे कोणतीही कागदपत्रे अथवा पुरावे त्यात नव्हते. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान असणार आहे. दरम्यान एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूची बातमी एखाद्याच्या स्वप्नात जाऊन देतो आणि त्यावरून पोलीस तपास करतात ही खरंच प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे. तपासात जरी मृतदेह सापडला असला तरी या प्रकरणाचे गूढ मात्र पोलिसांना उलगडावे लागणार आहे. हे प्रकरण ज्या तरूणामुळे समोर आले त्याची देखील चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.


