‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीचे अपघाती निधन
मराठी मनोरंजन सृष्टिवर शोककळा, खराब रस्त्याचा प्रश्न एैरणीवर
कोल्हापूर दि १३(प्रतिनिधी)- ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधव यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. पण त्याच्या अपघाती निधनाने मराठी मालिका विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच कल्याणीने हाँटेलात क्षेत्रात पदार्पण केले होते.
कल्याणी यांनी ‘प्रेमाची भाकरी’ नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी त्या हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. कल्याणी मराठी टिव्ही जगतातील एक दमदार अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला होता. तुझ्यात जिव रंगला या मालिकेमुळे ती विशेष लोकप्रिय झाली होती. कलाक्षेत्रात आपलं नाव करु पाहणा-या कल्याणीच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टिवर शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.