कोकणात अपघातवार, रायगड आणि सिंधुदुर्गात भीषण अपघात
दोन भीषण अपघातात १३ जण ठार, जखमी २४ जणांवर उपचार सुरु
कोकण दि १९(प्रतिनिधी)- कोकणात गुरुवारची सकाळ दुर्देवी ठरली आहे. सकाळपासून कोकणात दोन मोठे अपघात झाले आहेत. या भीषण अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आणि माणगाव जवळ हे दोन अपघात झाले आहेत. दोन्ही अपघात भीषण आहेत.
पहिला अपघात रायगड जिल्ह्यात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार मुंबईहून गुहागरच्या दिशेने जात होती. मृतांमध्ये पाच पुरुष आणि तीन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय बालक बचावला आहे. तर दुसरा अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये झाला.मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली जवळील वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून गोव्याला जात होती. बसमध्ये ३६ प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पहिल्या अपघाताचे कारण अस्पष्ट असुन दुसरा अपघात हा गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने झाला आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर वाहने बाजूला घेत महामार्ग खुला केला.पण अपघातामुळे वाहतूक मंदावली होती.