निवडणुकीतील पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई
‘पनवती’ ही जनभावना, राहुल गांधींनी कोणाचे नाव घेतले नसतानाही भाजपाला का झोंबले?, मोदी सरकार दडपशाहीचे
मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे मात्र लोकांनी पाठ फिरवलेली आहे. भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर ईडीची कारवाई केली आहे, पण काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत, यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने नॅशनल हेराल्डवर कारवाई करत आहे पण अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पराभव दिसू लागताच मोदी सरकार ईडीचा दुरुपयोग करून अशा प्रकारच्या कारवाया करून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही. संपूर्ण देशाला या प्रकरणाचे सत्य माहित आहे. यापूर्वीही याच प्रकरणात मा. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनाही चौकशीच्या नावाखाली बोलावून दहा-दहा तास बसवून नाहक त्रास देण्यास आला होता, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. नॅशनल हेराल्ड चालवणारी असोसिएटेड जर्नल या कंपनीकडून गांधी कुटुंबातील कोणाला किंवा कंपनीच्या कोणत्याही संचालकांना पगार किंवा नफा मिळत नाही. त्यामुळे त्यात काही घोटाळा झाला हा भाजपचा आरोप खोटारडा आहे. आता पाच राज्यातला दारूण पराभव समोर दिसत असल्याने भाजपने पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखला असून ईडीही भाजपला पराभवापासून वाचवू शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. तसेच आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ठरावीक वेळेत घ्यायला हवी होती. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाचे नाव देशात घेतले जाते पण भाजपाने घाणेरडे राजकारण करत या लौकिकाला कलंक लावला आहे. विधानसभा अध्यक्षांवर मा. सुप्रीम कोर्टाला ताशेरे ओढावे लागले ही कलंक लावणारी बाब आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र राखले पाहिजे. लोकसभा अध्यक्षपदाचे नेतृत्वही महाराष्ट्राने केलेले आहे पण आज जे चालले आहे ते बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनवती…पनवती असा आवाज येत होता, त्यासंदर्भाने राहुल गांधी बोलले, त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो? अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनवती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता, आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्व ठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. असे पटोले म्हणाले आहेत.