पुणे मनपातील समाविष्ट गावातील अनधिकृत फलकांवर होणार कारवाई
आयुक्तांचे स्पष्ट आदेश, फुकटची चमकेगिरीला दंडाचा दणका
पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्यापासून महापालिकेने मध्यंतरी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. त्यानंतर आता समाविष्ट गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
पुणे महापालिकेत २०१७ आणि २०२० मध्ये टप्याटप्याने ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. जरी या गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला असला तरी अनेक निर्णय घेण्याचे अधिकारी पीएमआरडीकडे आहेत. त्यामुळे अनधिकृत फलकावर कारवाई करण्याबाबत महापालिकेचे कर्मचारी संभ्रमात होते. पण आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी फलकांवर कारवाई करा आणि दंड वसूल करा, असे आदेश त्यांनी आकाशचिन्ह आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकारने पीएमआरडीएला केवळ बांधकाम विभागासंदर्भातील अधिकार दिले आहेत. अन्य अधिकार त्यांना नाहीत, त्यामुळे समाविष्ट गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करा, असे स्पष्ट आदेश विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांवर पीएमआरडीए नव्हे, तर महापालिकेकडून कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी गावांमधील अनधिकृत जाहिरात फलकांबाबतचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये १ हजार ९६५ अनधिकृत जाहिरात फलक असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ३०० जाहिरात फलक अधिकृत करावेत, यासाठीचे प्रस्ताव आले आहेत. शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी वाघोली, मांजरी, नऱ्हे, बावधन, सूस यांसह इतर भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक आहेत. त्यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.