‘मासे खाल्ल्यावर बाई माणूस चिकनी दिसते, कोणीही पटवून घेईल’
शिंदे सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त विधान, 'ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर'चा अजब दावा
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे सरकारमध्ये वादग्रस्त विधान करण्याची स्पर्धाच सुरु असल्याची स्थिती आहे. काही दिवसापूंर्वी भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदारांनी कसे कसे मंत्रीपद मिळवले याची कहानी सांगितली होती. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. पण आता राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारवर चाैफेर टिका होत आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी वादग्रस्त विधान करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. ते म्हणाले अभिनेत्री ऐश्वर्या राय ही मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्हीही मासे खाऊन डोळे सुंदर करा. म्हणजे जिला पटवायचे तिला पटवता येईल, असा अजब दावा त्यांनी केला आहे. धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यात ते मासे खाण्याचा फायदा सांगत होते. ते म्हणाले, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणी बघितलं तर लगेच पटवून घेणार. त्वचाही चांगली दिसू लागते. माश्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली होते. असेही गावीत म्हणाले आहेत. यावेळी व्यासपीठावर खासदार हिना गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. गावीत यांच्या या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. गावीत हे आपल्या या वक्तव्यामुळे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांनी २०१९ च्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. ते नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.
सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते. शिंदे गटाचे बांगर तर अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत.