
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले आहे.महाराष्ट्राची निष्ठा शरद पवार यांच्यावर आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या विचारांवर कायम आहे. महाराष्ट्र आगामी निवडणुकांच्या तयारीत असताना, लोकहितासाठी, समतेसाठी व इतर मूलभूत अधिकाऱ्यांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
आम्ही भाजपासोबत गेल्यानंतर शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती, आम्ही विनंती केल्यानंतर ते आमच्यासोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते, असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला होत .हा दावा खोटा असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी थेट अजित पवार यांनाच सुनावले आहे. पटेल यांचे विधान मतदारांमध्ये संभ्रम पेरण्यासाठी हेतुपुरस्सर केलेला प्रयत्न असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे.
महेश तपासे म्हणाले, शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती.ही कृती शरद पवारांच्या राजकीय विचारांच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे.पाठिंबा देण्याचा प्रस्ताव नाकारल्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतरांसाठी निराशाचे कारण झाले.ही मंडळी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात प्रासंगिकता राखण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहेत.
महेश तपासे म्हणाले, अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांच्या सर्व चौकशा आता बंद झाल्या आहेत.अनेक प्रकरण थंड बस्त्यात पडली आहेत व हेच भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रमुख कारण होते.भाजपसोबत जाण्यात विकासाचा कुठलाच मुद्दा नव्हता, असे तपासे म्हणाले.