पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुण्यातील मंगळवार पेठेमधील जुन्या बाजारात अचानक आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की, यामध्ये बाजार पेठेतील ६ ते ७ दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये स्थानिक दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठी धावपळ झाली.
पुण्यातल्या मंगळवार पेठ जुना बाजार या ठिकाणी दाट वस्तीमध्ये चार ते पाच दुकानांमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक धुराचा मोठा लोट पाहायला मिळाला. त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडली. काहींनी ही माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले. पण दाट लोकवस्तीमुळे त्यांना आगीच्या ठिकाणा पर्यंत जाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. पण अग्निशमन दलाले कसरत करत तासाभरात आग आटोक्यात आणली पण त्यापूर्वी सात ते आठ दुकाने जळून खाक झाली होती. या घटनेत कोणालाही शारीरिक इजा झाल्याची माहिती नाही. पण वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आगीमध्ये स्थानिक दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून सध्या आता कुलिंगच काम सुरू आहे.आग शार्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंगळवार पेठेतील या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. तर शेजारी मोठी झोपडपट्टी आहे. ही आग झोपडपट्टीपर्यंत पोचली होती.काही झोपड्यांना याची झळ बसली पण तोपर्यंत आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.