
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्री पद आणि आमदारकी रद्द?
कोकाटेंना न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा,नेमकं प्रकरण काय?महायुतीला झटका
मुंबई – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
१९९५ मध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने आता कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावल्यास त्याचे सभागृह सदस्यत्व रद्द होते. पण, या शिक्षेनंतर आ. कोकाटे हे वरिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात. तेथे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते का हे महत्त्वाचे आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे म्हणाले की, ही राजकीय केस होती. गेल्या ३० वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली होती. त्यावेळेस तुकाराम दिघोळे राज्यमंत्री होते. माझं आणि दिघोळेंचे राजकीय वैर होतं. त्या वैरापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती, असा आरोप केला आहे. कोकाटे यांना तातडीने वरील न्यायालयात जाऊन शिक्षेला स्थगिती मिळवावी लागेल. अन्यथा त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.
कोकाटे यांची विधिमंडळ सदस्यता धोक्यात आली आहे. याप्रकरणी आता माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच शिक्षेविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.