
ऎश्वर्या रायने पतीकडून पोटगी म्हणून मागितले एकरकमी ३६ कोटी
ऐश्वर्या राय यांनी आता नव्याने केल्या मागण्या, घटस्फोटाचा वाद आणखी चिघळला, काय आहेत मागण्या
पटना – राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा माजी मंत्री तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटप्रकरणी कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या सुनावणीत ऐश्वर्या राय यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. राबडी देवी यांच्या बंगल्याइतकं मोठे घर मिळावे. एक कार, ड्रायव्हर आणि नौकरही मिळावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर दरमहा १.५ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी. आणि पटणातील प्रतिष्ठित एसके पुरी भागात घर असावे अशी भली मोठी यादी सादर केली आहे. कोर्टाने ऐश्वर्या राय यांना एसके पुरी परिसरातील निवासस्थळ निवडून त्याची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे. यापूर्वी गोला रोड येथे तीन खोल्यांचा फ्लॅट ऐश्वर्याला देण्यात आला होता. यासाठी दरमहा २० हजार रुपये खर्चही केले जात होते. त्याचबरोबर ऎश्वर्या रायकडून एकरकमी ३६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण तेजप्रताप यादव यांनी त्याला नकार दिला आहे. पटना उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टला जुलै महिन्यात आदेश दिला होता की ६ महिन्यांत हा खटला निकाली काढावा. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.
तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. परंतु एका वर्षातच दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. ऐश्वर्या यांनी राबडी देवी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सासरच्यांनी आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप ऎश्वर्याने केला होता.