
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले असून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. दरम्यान, बारामतील लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा झाली होती.शरद पवार यांना बारामतीतून संपवणार, बारामतीतून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. गुरुवारी शिरुरमध्ये अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत चंद्रकांत दादांच्या या वक्तव्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं.
शरद पवार साहेब निवडणुकीला उभाच नव्हते तर त्यांचा पराभव करण्याचा प्रश्न येत नाही. ते निवडणुकीला उभा असते तर गोष्ट वेगळी होती. बारामतीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या उभा आहेत, तर पराभव या दोघींपैकी एकीचा होईल ना. तरी चंद्रकांत पाटील तसं का बोलले माहिती नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना आम्ही सांगितलं तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते आम्ही पाहतो. त्यानंतर ते गप बसले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं हे आम्ही मान्य करतो. त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही बारामतीत येऊ नका, आम्ही बघतो. जी व्यक्ती उभा नव्हती त्यांच्या पराभवाची भाषा योग्य नव्हती असंही अजित पवार यांनी म्हटलं.
मी शरद पवारासांबोत फार जवळून काम केलंय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहितीय. शरद पवार अनेकदा संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि तो सामुहिक निर्णय असल्याचं दाखवतात असंही अजित पवार म्हणाले.अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, आम्ही निर्णय घेतला तेव्हा ते एकटेच विरोध करत होते. त्यांना हवा तोच निर्णय ते घेतात आणि फक्त दाखवतात की तो निर्णय सामुहिक आणि चर्चा करून घेतला आहे. शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, ते मनाला वाटेल ते करतात आणि त्यांचा तो स्वभाव बदलणं शक्य नाही.