अजित पवार यांचे थेट मुख्यमंत्री शिंदेच्या अधिकारावर अतिक्रमण
वॉर रुमवरुन एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यात शीतयुद्ध, पवार मुख्यमंत्री होणार?
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गट कमालीचा नाराज आहे. शिंदे गटातील महत्वाची खाती अजित पवार गटाने ताब्यात घेतली होती. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सरकारमध्ये कोल्ड वाॅर सुरु झाले आहे.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना निधीसाठी अजित पवारांची मनधरणी करावी लागत आहे. पण आता अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाॅर रूममधून अजित पवार यांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून गुरुवारी एक बैठक घेतली. या बैठकीपासून वॉर रूमचे सर्वेसर्वा राधेश्याम मोपलवार यांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे यापुढे राज्यातील प्रकल्पांवर कोण नजर ठेवणार? असा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्याच्या वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाला आहे. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात मलिदा खायचं असेल तर मिळून खातात पण जनतेच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. अजितदादा विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी मी नगरविकास खात्याचा मंत्री असताना दादा तुम्ही माझ्या खात्याच्या परस्पर बैठका घ्यायचात. तेव्हा मी काही तुम्हाला कधी बोललो?, असा सवाल काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अभूतपूर्व पवार यांनी प्रस्तुत बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्गिका १, १ व ३ ची उर्वरित कामे, पुणे – नाशिक रेल्वेमार्ग, पुणे रिंग रोड, पुण्यातील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचे चौपदरीकरण, ‘सारथी’चे प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवन आदी कामांचा आढावा वाॅररुममधून घेतला होता.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात अजित पवारांच्या पुढाकाराने ह्याच कामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट म्हणजे नियंत्रण कक्ष सुरू केला होता. पण ठाकरे सरकार गेले आणि या कक्षाचेही काम थांबले. आता अजित पवार यांनी पुन्हा हा कक्ष सुरू केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.