अजित पवार गट बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढणार
अजित पवारांचे बारामतीच्या मैदानात शरद पवार यांना आव्हान, लोकसभेच्या आचारसहिंतेची तारीख सांगितली, उमेदवारही ठरले?
मुंबई दि १(प्रतिनिधी)- एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा करत शरद पवार यांना दुसरे आव्हान दिले आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना अशी लढत होणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तीन दिवसीय चिंतन शिबीर कर्जत येथे पार पडत आहेत. या शिबिरात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, आपल्याला आता जोमाने काम करावं लागणार आहे. शिरूर, बारामती, सातारा, रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढविणार आहोत. तसंच ज्याठिकाणी ठाकरे गटाचे खासदार आहेत. त्या जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितले आहे. निवडणुकीच्या बाबतीत बोलताना अजित पवार म्हणाले की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडून आणायचे आहेत. असे म्हणत महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. तसेच काही आरोपांमुळे भाजपासोबत गेल्याच्या आरोपाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, काही गुन्हे दाखल झाले होते म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असा आरोप होत आहे. परंतु हे सर्व चुक आहे. आरोप झाले म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. असं समजू नका. कारण याआधी अनेकांवर आरोप झालेत. असंही अजित पवारांनी सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील यांना अजित पवार आव्हान देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्राची नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे आव्हान स्वीकारले असल्याचे संकेत दिले आहेत.