नाराज अजित पवार पाच दिवसांपासून नॉट रिचेबल
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, विरोधकांचा निशाना
मुंबई दि ९(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्विट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे विरोधकही ट्विस्ट वाढवणारी विधाने करत आहेत.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीरापासून अजित पवार नाॅट रिचेबल आहेत. शिबीरामध्ये शरद पवार आजारी असतानाही आले. पण अजित पवार मात्र दुस-या दिवशी अधिवेशनात फिरकलेही नाहीत. त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे.आणि त्यातही अजित पवार यांचे नाॅटरिचेबल असणे हा केवळ योगायोग नसावा असे राजकीय जाणकार म्हणत आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सत्तार यांनी असभ्य भाषा वापरल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला होता पण अजित पवार यांनी यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.तसेच ते कुठल्या कार्यक्रमातही दिसले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या नाराजीचे एक कारण त्यांचे पुत्र पार्थ पवार असावेत असा अंदाज आहे. अजित पवार पार्थ पवार यांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण शरद पवार यांचा त्याला विरोध आहे. म्हणून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अजित पवार नाॅट रिचेबल असल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे.
अजित पवार गायब असल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.भाजप आणि मनसेने राष्ट्रवादी फुटीचा दावा केला आहे.मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत अजितदादा हे पवार साहेबांवर नाराज होवून काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? गुवाहाटीच्या वाटेकडे लक्ष ठेवा अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.