पुण्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार आमनेसामने ; पुण्यातील दोन जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना रंगणार
भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण ४५ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये पुण्यातील दोन जागांचा देखील समावेश करण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे येथे पत्रकारपरिषद घेत ही यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुण्यातील वाडगावशेरी व हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले व पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते असलेले बाप्पू पठारे यांना पक्षाने वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. बाप्पू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे देखील आमदारकी लढवण्यासाठी इच्छूक होते, मात्र बाप्पू पठारे यांच्याच नावाला शरद पवार यांची पसंती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.आज जाहीर झालेल्या जागावाटपात ही चर्चा खरी ठरली असून वडगावशेरीतून बाप्पू पठारे हेच तुतारी हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हडपसरची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार असेही बोलले जात होते. सेनेतून माजी आमदार महादेव बाबर यांचे नाव हडपसर येथून आघाडीवर होते. मात्र जयंत पाटील यांनी ही जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
या दोन्ही जागांवर फूट पाडण्यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. फूट पडल्यानंतर वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये हडपसर येथून चेतन तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वडगावशेरीच्या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नसला तरी अजित पवार यांनी आधीच टिंगरे यांना AB फॉर्म दिला असून उमेदवारीची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे बोलले जात आहे. स्वतः सुनील टिंगरे यांनी देखील ही जागा आपणच लढवणार असल्याचे स्प्ष्टपणे सांगितले आहे. हाडपसर येथे अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असल्याने येथील थेट लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. वाडगावशेरी येथून सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळाल्यास येथे त्यांची बाप्पू पठारे यांच्याशी लढत होईल. एकंदरीतच तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना रंगणार असल्याने चुरस पाहायला भेटणार आहे.