
अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे.अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल.’निलेश लंकेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले, गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे.राष्ट्रवादी एकत्रित असताना निलेश लंके यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, व अजित पवार या तिन्ही नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते प्रथम शरद पवार गटात गेले, नंतर काही दिवसांतच अजितदादा गटात परतले, लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटात आले आहेत.निलेश लंके पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते. तत्कालीन शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या प्रकरणातून त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले व पारनेर-नगर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
महायुतीमध्ये नगरची जागा भाजपकडे आहे तर महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवार गटाकडे आहे. नगरच्या जागेसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंके तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना तिकीट देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांचा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, 13 मे रोजी अहमदनगर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.