
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार अडकणार लग्नबंधनात
जय पवार या जिल्ह्याचे जावाई, या तारखेला होणार साखरपुडा, कोण आहेत अजित पवार यांच्या सूनबाई?
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय पवारांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवली त्यावेळेस जय पवार यांनी जोरदार प्रचार केला होता. तसेच अजित पवार यांच्यावतीने बारामती मधील अनेक पक्षीय स्तरावरील कामे जय पवार करताना दिसत आहेत. जय पवार यांचं लग्न सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत होणार आहे. तर, जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेले आहे. तर लग्न हे डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि शरद पवार हे राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी कौटुंबिक सोहळ्यामध्ये ते पुन्हा एकत्रित दिसणार आहेत. पार्थ पवार हे मात्र सध्या राजकारण आणि समाजकारणापासून अंतर राखून असल्याचे दिसत आहे.
पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला आहे. सध्या मुंबई, बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याचे सांगितले जाते.