सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या
पुरंदर, भोर, वेल्ह्यात बीएसएनएल टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभारण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय दळणवळण तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी याविषयी सविस्तर चर्चा करत त्यांना लेखी पत्रही दिले. बारामती लोकसभा मतदार संघातील भिगवण हे मोठी बाजारपेठ असलेलं शहर आहे. शिवाय सोलापूर पुणे महामार्गावरील एक महत्वाचे शहर असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे, ही बाब त्यांनी वैष्णव यांच्या लक्षात आणून दिली.
रोज प्रवास करणारे हजारो कामगार, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी आणि अन्य सर्वसामान्य नागरिकांसाठी भिगवण रेल्वेस्थानकावर गाडी थांबणे अत्यावश्यक आहे. कुरकुंभ, इंदापूर, भांडगाव, जेजुरी आणि बारामती याठिकाणच्या औद्योगिक वासहतींमध्ये काम करणारे हजारो कामगार या स्थानकाचा वापर करतात. याशिवाय पुणे आणि सोलापूर शहरात दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही प्रचंड मोठी आहे. इतकेच नाही, तर वैद्यकीय उपचारांसाठी पुणे-मुंबईला जाणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठी आहे. अशा रुग्णांना सध्या खासगी गाड्यांचा वापर करावा लागत असून तो अत्यंत खर्चिक आहे, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले
पुणे ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या एकूण सहा रेल्वेगाड्यांचा भिगवण स्थानकावरील थांबा कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन लागले त्यावेळी बंद करण्यात आला. तो अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आलेला नाही. लॉकडाऊन जाऊन आता दोन वर्षे होत आली तरी अद्याप त्या सहा गाड्या याठिकाणी थांबत नाहीत. मुंबई-पंढरपूर आणि मुंबई-विजापूर या गाड्यांना भिगवण स्थानकावर थांबा देण्यात यावा. याबरोबरच दौंड, जेजुरी आणि नीरा स्थानकावरून ज्या रेल्वेगाड्या जातात त्या सर्वच गाड्यांना त्या त्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी याठिकाणी रेल्वेगाड्यांना थांबा असणे अत्यावश्यक आहे. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीची मोठी अडचण आहे. या गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर उभरावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागणीबाबत आपण नक्कीच सकारात्मक विचार कराल, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आभार मानून उदघाटनाचे निमंत्रण
दौंड शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुरकुंभ मोरीचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले. या कामास आवश्यक परवानग्या देऊन लवकरात लवकर काम पूर्ण होण्यास सहकार्य केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. याचबरोबर या मोरीचे औपचारिक उदघाटन करण्यासाठी अवश्य यावे, असे निमंत्रणही त्यांनी यावेळी दिले.