
निवडणुकीत पराभूत होऊनही अमित ठाकरे आमदार होणार?
भाजपाची राज ठाकरेंना ऑफर, शिंदेंचा विरोध डावलून भाजपा आणि मनसेची युती होणार?
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस आणि राज ठाकरे यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केली. या बैठकीनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर अमित ठाकरे यांना हे पद मिळाले, तर मनसे आणि भाजप यांच्यातील राजकीय जवळीक आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून सध्या विधानपरिषदेमध्ये १२ आमदार आहेत, त्यातील ५ जागा रिक्त आहेत. यामध्ये भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा मनसे यांची युती देखील होऊ शकते. आगामी निवडणुकांमध्ये भाजप, मनसेला काही जागा सोडू शकते. यावरून पक्षांमध्ये मित्रत्वाचा नवा अंक सुरू होणार का? हे पाहावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मनसेची साथ हवी आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मुलगा अमित ठाकरे यांचा पराभव झाल्याने राज ठाकरे हे नाराज होते. पण अमित ठाकरे यांच्यामुळे शिंदे गटाचे सदा सारवणकर पराभूत झाले होते. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार महायुतीत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना तडजोड करावी लागली होती. आता मनसे महायुतीत आल्यानंतर शिंदे गटाला महापालिका जागावाटपात तडजोड करावी लागू शकते.
अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.