अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?
अजित पवारांना दिलेल्या साथीचे प्रायश्चित करणार, मतदारसंघात कोल्हेंवर नाराजीचे ढग, केला मोठा खुलासा
पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केले होते. पण आता अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व चकित झाले आहेत.
अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित लावल्यानंतर मतदारसंघात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर आता अमोल कोल्हे यांना साथ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. पण एका दिवसातच यु टर्न घेत अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना साथ दिली. पण तरीही त्यांच्याविषयी अविश्वासाचे वातावरण असल्याने कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले “शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी खासदारकी पदाचा राजीनामा देणार आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन मी त्यांना माझा राजीनामा सोपवणार आहे. मी माझ्या कामानिमित्त अजित पवारांना भेटायला गेलो होतो. तिकडे शपथविधी होणार याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्या ठिकाणी गेल्यावर मला याबद्दल माहिती मिळाली. राजकारणामध्ये मी लोकांचा विश्वास तोडण्यासाठी आलो नाही. सध्या सुरू असलेल्या राज्यकारणात मी माझी भूमिका कशी बदलू शकतो” असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला. दुसरीकडे पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अमोल कोल्हे यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याबाबत दोन्ही गटांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. पण अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करणार हे मात्र अद्याप स्पष्ट केलेले नाही.
शरद पवार अमोल कोल्हे यांचा हा राजीनामा स्वीकारतील का? असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे राजिनामा लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो, पक्षाच्या अध्यक्षांकडे नाही अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली जात आहे. पण आता आगामी लोकसभा निवडणूकीत कोल्हे यांच्या विजयाबद्दल साशंकता असणार आहे.