राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्या नवीन राजकीय पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं असून काल त्यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील अकोले येथे दिवंगत अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला.या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षरीत्या घोषणा केली असून या तरुण नेत्यामागे आपली ताकद उभी करा, असं आवाहन लोकांना केलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सांगली दौऱ्यात असताना दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची विधानसभेसाठीची उमेदवारी जाहीर केली होती. अकोले येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता शरद पवारांनी इथं तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत त्याच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, “अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही पाठीमागे राहा आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकतीने आम्हा लोकांची मदत असेल . मी तुम्हाला खात्री देतो की, अकोले तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तो निकाल आम्ही घेतला आहे. ५ वर्षांपूर्वी एका डॉक्टरला निवडून दिलं, मीच तुम्हाला सांगितलं निवडून द्यायला. मला असं वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल, लोकांना पाठिंबा देईल, लोकांची साथ सोडणार नाही इथे भाषण केलं काही झालं तर पवार साहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला भलती तिकडेच जाऊन बसला. आता कुठे बसायचं? हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी ठरवायचं आहे आणि हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा,” अशी साद पवार यांनी जनतेला घातली आहे.
जयंतीनिमित्त आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या आठवणी जागवताना शरद पवार यांनी म्हटलं की, “आजचा हा कार्यक्रम स्व. यशवंतराव भांगरे यांच्या ६१ व्या जयंतीच्या निमित्ताने आहे. हा कार्यक्रम कौटुंबिक जसा आहे तसा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अकोले तालुका हा महाराष्टाचा आदिवासीबहुल तालुका, अतिवृष्टी असलेला तालुका, भंडारदरा सारखं प्रचंड धरण असणारा हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाळच्या दुष्काळी नगर जिल्ह्याला पाणी देण्यासंबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणार नेतृत्व हे जन्माला आलं ज्याच्यामध्ये यशवंतराव भांगरेंच नाव घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रामाणिकपणाने मांडणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतरावांचा उल्लेख हा आम्हा सगळ्यांना करावा लागेल. नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी अशोकरावांनी घेतली. दुर्दैवाने नियतीच सांगणं काही वेगळं होतं आणि ते तुम्हा-आम्हा सगळ्यांच्यातून लवकर निघून गेले.
पण त्यांचा विचार हा होता की, नवीन पिढी तयार करायची आणि त्या पिढीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील? याची खबरदारी घ्यायची आणि त्यासंबंधीची आस्था त्यांच्या मनात होती. मला आठवतंय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो, त्याठिकाणी अशोकराव होते. भाषणाला उभे राहिले आणि अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेची एकच गोष्ट सांगितली मला की पवारसाहेब, आमचं तुमच्याकडून काही मागणं नाही फक्त एकच काम करा “माझ्या मुलावर लक्ष ठेवा” अमितच्यावर लक्ष ठेवा. अमितवर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतून माझ्याकडून घेतला. अशोकरावांच्या डोळ्यात पाणी होतं पण चिंता नुसती अमितची नव्हती तर अकोल्याच्या गोरगरीब जनतेची होती आणि त्या जनतेची, त्यासाठी कष्ट करणार, त्याच्यासाठी बांधिलकी ठेवणार, त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणार ही त्यांची अपेक्षा अमित आणि सुनिता ताईंकडून होती. मला आनंद आहे की, आज त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला,” अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या आठवणी सांगितल्या.