अजित पवारांना आज पुन्हा एक धक्का !आमदार राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ; गायत्री शिंगणेंची नाराजी अन् थेट पवारांना सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आज पुन्हा एक धक्का बसला असून पक्षाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली होती. मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा आपण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.”जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे मी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलो होतो. मात्र मला राजकीय आयुष्यात मोठं करण्यात पवार साहेबांचाच हात आहे. त्यामुळे मी आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशानंतर राजेंद्र शिंगणे यांनी मांडली आहे. या पक्षप्रवेशावेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संसदीय मंडळाचे सदस्य हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते.
राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांसोबत असल्याने शरद पवार यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून त्यांनी राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे हिला आपल्या पक्षात घेतलं होतं. मात्र आता स्वत: राजेंद्र शिंगणे यांनीच तुतारी हाती घेतल्याने गायत्री शिंगणेंची अडचणी झाली आहे. या पक्षप्रवेशावर बोलताना गायत्री शिंगणे यांनी म्हटलं आहे की, “आमचे काका राजेंद्र शिंगणे यांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्याचे आम्ही बातम्यांमधून पाहत आहोत. या निमित्ताने मला पक्षाला आणि पवारसाहेबांना विचारायचं आहे की, आता एकनिष्ठेचं काय? राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर मागील एक वर्षांपासून मी तुतारी घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे. असं असताना तुम्ही पुन्हा राजेंद्र शिंगणे यांना प्रवेश दिला आहे. मग आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं?” असा सवाल विचारात गायत्री शिंगणे यांनी आपल्याला पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलं आहे.