एटीएम मशीन फोडता न आल्याने एटीएम मशीनचीच केली चोरी
चोरीसाठी चोरट्यांची अनोखी शक्कल, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसही हैरान
नाशिक दि ९(प्रतिनिधी)- चोरीचा घटना आपण पाहत किंवा एैकत असतो. पण सध्या एक विचित्र चोरी करण्यात आली आहे. नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेल्या एटीएम सेंटरमध्ये चोरी करताना चक्क एटीएम मशीनच चोरी करण्यात आले आहे. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नाशिकमध्ये चोरी करण्यात आलेले एटीएम एसबीआय बँकेचे होते. मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी न झाल्याने थेट मशीनचीच चोरी करण्यात आली. ही घटना सेंटरच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुरूवातीला एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात अपयश आल्याने एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी बोलवून त्यात मशीन टाकून चोरट्यांनी पोबारा केला. एटीएममध्ये किती रक्कम होती याबाबत अद्याप निश्चित आकडा समजू शकलेला नाही. मात्र एटीएम चोरणाऱ्या संशयतांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो. त्यामुळे ही वेळ साधण्यात आली. विशेष म्हणजे महिनाभरापुर्वी नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एटीएम मशीनची चोरी केली होती. पण पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहुन गाडीतून मशीन बाहेर फेकत पळ काढला होता.