अरे वा! बँक मॅनेजर तरूणीने शेतकरी मुलासोबत थाटला संसार
शेतकरीच नवरा हवा हा हट्ट केला पूर्ण, नोकरीवाला नवरा हवा मानसिकतेला दिला फाटा, काैतुकाचा वर्षाव
नांदेड दि ९(प्रतिनिधी)- मागील काही वर्षांत शेतकरी पुत्रांना मुली मिळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. एवढंच काय मुली मिळत नसल्याने सोलापूरात आंदोलन देखील करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित मुलगी देखील शेतकऱ्यांपेक्षा नोकरदाराला पसंती देते. पण नांदेड जिल्ह्यातील वैष्णवीने अनोखा निर्णय घेत तरुणींसमोर आदर्श निर्माण केला आहे. आपला नवरा शेतकरीच हवा अशी अट ठेवली होती. तिची ही अट पूर्ण झाली असुन तिने शेतकऱ्याशी लग्न केले आहे.
शेती करणाऱ्यापेक्षा नोकरदार मुलगा असावा, अशी अपेक्षा बहुतांश मुलीच्या पालकांची असते. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावातील वैष्णवी कदम हिच्या पालकांचीही तीच अपेक्षा होती. विशेष म्हणजे वैष्णवी उच्च शिक्षित आहे. ती उपवर झाल्यानंतर तिच्यासाठी मोठ्या शहरातून चांगली स्थळे स्वतःहून चालून येत होती. ती स्वतः नोकरी करत होती. पण तिने मला शेतकरीच नवराच हवा असा हट्ट धरला. सुरूवातीला पालकांनी याला विरोध केला. पण अखेर मुलीच्या हट्टापोटी त्यांनी होकार दिला. आज वैष्णवीचस विवाह यवतमाळ पुसद येथील नितीन पाटील सोबत संपन्न झाला आहे. नितीन पाटील याच्याकडे १५ एकर शेती आहे. वैष्णवीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. आपल्या वडिलांनी शेती करून वाढवले, शिकवले त्यामुळे शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल मनात खूप आदर आहे. त्यामुळे आपला नवराही शेतकरीच असावा अशी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली असल्याचे वैष्णवीने सांगितले आहे. दरम्यान वैष्णवीने एमएस इल्केट्रॉनिक्स आणि एमएसडब्लूची पदवी प्राप्त केली आहे. आता ती हदगाव तालुक्यातील गोदावरी अर्बन बँकेत मॅनेजरपदी कार्यरत आहे.
अलीकडे आईवडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून, जावई नोकरीवाला शोधतात. डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, बँकेत, पोलीस आदी क्षेत्रांत मुली नोकरी करत असल्यास, त्याच क्षेत्रात नोकरी करणारा मुलगा शोधला जातो. यामुळे ग्रामीण भागांत शेतकरी मुलांना स्थळ भेटणं अवघड झालं आहे. पण वैष्णवीच्या या भुमिकेचं सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या लग्नाची परिसरात चर्चा देखील होत आहे.