
देशात सध्या असत्याचा बोलबाला आहे. त्यामुळे ‘असत्यमेव जयते’ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे सूत्र आहे आणि आपल्या खोटेपणावर लोकांनी विश्वास ठेवावा असे त्यांना वाटत असले तरी देशातील सर्वच जनता ‘कंगना’बुद्धीची नाही आणि भाजपाच्या म्हणजेच मोदी यांच्या खोटेपणाबद्दल ती मोदी याना प्रश्न विचारून भंडावून सोडते, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.महाराणा प्रतापच्या चेतक घोड्याची आई गुजराती होती, असा शोध पंतप्रधान मोदी यांनी लावला. गटारात नळी टाकून गॅसनिर्मिती करता येईल, असेही त्यांनी सांगितले. अलीकडच्याच एका प्रचार सभेत आपले ‘ग्यानी’ मोदीजी म्हणतात, ”अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड आया.” मोदी यांच्यासाठी कोणी हवेत सिमेंटचा रस्ता बांधला काय? असा खोचक सवाल सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने केला आहे.
कितीही जोरदार फेकाफेकी केल्यावर टाळ्या पिटणारे आणि माना डोलवणारे अंधभक्त मिळाल्यावर ‘थापा’ मारण्याची नशा वाढतच जाते. गुरू आणि चेले त्या नशेत धुत होतात. महामारी कोरोनाही टाळ्या वाजवून आणि रस्त्यावर थाळ्या वाजवून पळून जाईल, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांच्या सहवासातच कंगनासारखे लाखो ज्ञानी तयार झाले आहेत, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.
मोदी यांचे वैवाहिक जीवन, मोदी यांची डिग्री, मोदी यांचे चहा विकणे, मोदी यांचे भीक मागून जगणे, मोदी यांचा भ्रष्टाचारविरोधी तथाकथित लढा, ‘न खाऊंगा न खाने दूंगा’सारख्या गर्जना, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकून आणण्याच्या वल्गना, काळा पैसा नष्ट करण्याचे दाखविलेले स्वप्न हे सर्व कसे एकजात झूठ होते, हे आता उघड झाले, असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
मोदी हे रोजच खोट्या आश्वासनांचा धुरळा उडवत आहेत आणि तो धुरळा म्हणजे राष्ट्रीय सुगंधाची बरसात असल्याचे कंगनासारख्यांना वाटणे साहजिक आहे. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेकार तरुणांना पकोडे तळण्याचे अर्थशास्त्र सांगतात. 2014नंतर स्वतंत्र झालेल्या विकसित भारताचे हे धोरण आहे. मोदी यांनी त्यांचा नवा भारत खोटेपणा आणि फेकाफेकीच्या पायावर उभा केला. त्या नवभारतात कंगनासारखी बालके बागडतात आणि आनंद घेतात. त्यांच्या निरागस वागण्या-बोलण्यावर कोणी शंका घेऊ नये, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.