
मुख्यमंत्र्यावर हल्ला, तरुणाने कानशिलात लगावली
हल्ला करणारा अटकेत, हल्लेखोर गुजरातचा, राजकीय वर्तुळात खळबळ, धक्कादायक कारण
दिल्ली – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान झालेल्याहल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सकाळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता या सिव्हिल लाइन्स येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी साप्ताहिक ‘जनसुनावणी’ घेत होत्या. यावेळी सुमारे ३५ वर्षीय एका व्यक्तीने तक्रार देण्याच्या बहाण्याने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्याने आधी काही कागदपत्रे मुख्यमंत्री गुप्ता यांच्याकडे दिली आणि काही कळण्याच्या आतच त्याने त्यांच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे उपस्थित अधिकारी आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत हल्लेखोराला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात घेऊन सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू असून, त्याने आपले नाव राजेश खिमजी असल्याचे सांगितले आहे. तो गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस त्याच्या नावाच्या आणि पत्त्याची पडताळणी करत आहेत. संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केले. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही त्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आठवड्यातून एकदा जनता दरबार घेतात. आज सकाळीही त्या जनता दरबारमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर दिल्ली भाजपने याचा निषेध केला आहे.