पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार बुधवारी सांयकाळी उरुळी कांचन भागात असणाऱ्या शिंदवने रस्त्यावर घडला आहे.
भारती होले असे मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्या उरुळी कांचन पोलीस चौकीत कार्यरत आहेत. हमाल किशोर निवृत्ती गरड हा शिंदवने रस्त्यावर एका किराणा दुकानात किराणा माल उतरवत असताना, तिथे भारती होले आल्या आणि त्यांनी थेट गरडला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. असा आरोप किशोर गरड यांनी केला आहे.तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती होले याने गरड यांनी नियम मोडल्यामुळे कारवाई करत असताना गरडने सहकार्य न केल्याने त्याला कायदा दाखवावा लागला असा दावा केला आहे.
मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून पोलिसच कायदा हातात घेत असतील तर काय करणार? अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. काही जणांनी महिला पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.