
किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न
घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी पसार बीडमधील गुंडराज संपेना आठवडाभरात तिसऱ्या हत्येचा प्रयत्न
बीड- बीडमधील गुन्हेगारी संपण्याचे नाव घेत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशाचे लक्ष बीडकडे असतानाही हत्या, धमकी आणि मारहाणीच्या घटना सुरूच आहेत. बीडमधील माजलगाव तालुक्यात आठवड्यापुर्वी भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा बीडमध्ये हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे.
माजलगावमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यातील जखमी उत्तम बाबासाहेब विघ्ने याची प्रकृती गंभीर असून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ कारणातून हा हल्ला करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील तेलगाव रोड वर असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्स शोरूमकडे दोन व्यक्तीमध्ये कुरबुर सुरू होती. ही कुरबूर वाढून आलेल्या रागातून दुस-या व्यक्तीबे उत्तम बाबासाहेब विघ्ने यांच्या डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, व्हिडिओत दिसत आहे की, सुरूवातीला उत्तम बाबासाहेब विघ्ने यांना लाथा मारून खाली पाडले, आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात विघ्ने हे गंभीर जखमी झाले आहेत. उत्तम बाबासाहेब विघ्ने यांच्यावर माजलगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या पाच दिवसांत दोन हत्या झाल्यानं माजलगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांत माजलगावात दोन हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही तिसरी घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजलगावमध्ये रवीवारी महादेव गायकवाड यांच्या गावरान धाबा हॉटेल मध्ये बील देण्यावरून वाद झाल्याने गायकवाड यांची हत्या करणाऱ्या रोहित शिवाजीराव थावरे, ऋषीकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांना अटक करण्यात आली आहे.